आज आम्हाला येथे Auckland, New Zealand येऊन १० वर्षे होतील.

on

आज आम्हाला येथे Auckland, New Zealand येऊन १० वर्षे होतील. ते दिवस असे होते कि आमच्या मित्र मंडळींपैकी अनेक जण USA, England फार फार तर Germany,France आणी Gulf ला जात असत. New Zealanad केवळ ह्रितिक रोशन याच्या “काहो ना प्यार है” या सिनेमा मूळे आणी त्यांच्या क्रिकेट टीम मुळे परिचित असलेला देश होता!! आज परिस्थिती खूपच वेगळी आहे. अनेक भारतीय विशेषतः विद्यार्थी येथे वाढत्या संख्येने येत आहेत. परंतु त्या वेळी मात्र “तिथे जाऊन काय नक्की करणार,अतिशय निसर्ग सुंदर देश आहे परंतु खूपच लांब आहे हो, अश्या अनेक commentsआम्ही ऐकल्या आणी लग्नानंतर ८ महिन्यांनी हातातले कायमस्वरूपी जॉब्स सोडून work visa घेऊन इकडे आलो……..
येताना केवळ २-५ वर्षे राहू या विचाराने आलेलो आम्ही, हळूहळू मात्र या देश्याच्या प्रेमात पडलो!
एअरपोर्ट वरून बाहेर पडल्यावर सगळ्यात प्रामुख्याने जाणवलेलं फरक म्हणजे लोकसंख्या – गर्दी!! मुंबई सारख्या अर्वाधिक लोकसंख्येच्या आता जलद शहरातून १० वर्षा पूर्वीच्या Auckland मध्ये आल्यावर असे वाटे कि रस्त्यावर आपण वगळता कोणी माणसेच नाहीयेत. काही गडबड गोधळ नाही, गाड्यांचे आवाज नाहीत फेरीवाले नाहीत, जणू काही जागाच नाही आजूबाजूस. याला अपवाद फक्त City Centre व CBD. अर्थात हि परिस्थिती देखील आता खूप मोठ्या प्रमाणात बदलली आहे. जरी मुंबई च्या तुलनेत खूप लहान, शांत आणी पूर्णतः वेगळे असले तरी हे गाव रुपी शहर आम्हाला मनापासून आवडले. आम्ही हळू हळू त्याला सरावलो आणी नकळत प्रेमातही पडलो हे खरे!

आम्ही दोघेही हातच्या नोकऱ्या सोडून आणी Auckland मध्ये नोकरीची कोणतीही job offer नसताना उलट वर १० लाख रुपयांचं शैक्षाणिक कर्ज घेऊन आलो असल्यामुळे सुरुवातीचे दिवस अगदी $२ चा हिशेब लिहून ठेवण्या एवढे काटकसरीचे होते. परंतु तरीही खूप छान, सोपे सुंदर आणी सरळ होते!
मुंबई ला मी Microbiology-Biotechnology मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतेले होते तर माझ्या नवऱ्याची हॉटेल Management ची पदवी होती. या दोन्ही क्षेत्रांना येथे त्या वेळी चांगली मागणी असल्यामुळे आम्हाला दोघांनाही पटकन नोकऱ्या मिळाल्या. पुढे हळू हळू जम बस गेला, कर्ज फिटलं, घर झालं, २ मुली झाल्या आणी आम्ही सर्वार्थाने New Zealand वासी झालो, हो अगदी पासपोर्ट शकत सर्वार्थने! परंतु याचा अर्थ असा मात्र नाही कि आम्ही भारतीय राहिलो नाही! किंबहुना अजूनही माझी ७ वर्षांची मोठी मुलगी असे सांगते कि मी “Kiwi-Indian” आहे तेव्ह्ना अभिमान आणी समाधान दोन्ही वाटते; दोन खूप सुंदर आणी पूर्णतः परस्पर विरोधी देशांची सांगड घालायची संधी आम्हाला मिळाली याचं!! एक अतिप्राचीन तर एक सर्वात तरुण देश! एक सर्वाधिक लोकसंख्येचा तर एक सर्वात कमी. त्या वेळी, आख्या New Zealand ची लोकसंख्या मुंबईच्या ३ उपनगरानेवढी होती!! भारत प्रचंड मोठा तर New Zealand केवळ महाराष्ट्रा एवढा. एक जिथे पावला पावलाला भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो तर की तो सात्यत्याने गेली ५ वर्षे सर्वाधिक प्रामाणिक देशांच्या यादीत वर्णी लावतो आहे, असे काही खुपरे फरक देखील समोर आले. आज या लेखाच्या निमित्ताने जेव्हा गेल्या अनेक वर्षांकडे बघते तेव्ह्ना या प्रवासाच्या अनेक छटांची, अनुभवांची मनात दाटी होते.

सुरुवातीच्या काळात, किंबहुना अजूनही काही प्रमाणात येथील प्रत्येक गोष्टीची भारतातील गोष्टींची तुलना मनात होत असे. येथील शिस्तबद्ध वाहतूक, public transport, banking इतर रोजच्या आयुष्यातील सेवा सुविधा जसे telecom connections, electricity connections इत्यादी सर्व काम एका फोने वरून घर बसल्या होतात. या उलट भारतात मात्र या सर्व कामांकरिता १० हेलपाटे घालावे लागतात आणि १०० अर्ज भरावे लागतात. याउलट आपल्याकडे खरेदी, मग ती दररोजची फळ भाज्या दूध ब्रेड असो किंवा सणासुदीची विशेष खरीदी असो त्यात जी गम्मत जिवंतपणा आणि सहजता आहे ती मारता येथे अगदीच नाही. बिल्डिंग मधून खाली उठरल्या क्षणी आपल्याकडे फळ भाज्या औषध खेळण्यांपासून सर्व काही हाताशी असतं. इथे मात्र अगदी छोट्या छोट्या वस्तूंसाठी गाडी काढा मॉल नाहीतर सुपर मार्केट मध्ये जा, गाडी पार्क करा आणि मग कुठे जाऊन ती खरेदी करा, या सगळ्या सोपस्करांचा कंटाळा येतो. त्यातून काही भारतीय वस्तू हव्या असली तर अजून वेगळी दुकान हिंडा!! परत येथील अंतर, हवामान या गोष्टी पाहता गाडीशिवाय कुठे गत्यंतर नाहीच!
जी गोष्ट खरेदीची तीच बाहेरच्या खाण्याची! इंडियन, चायनीज, इंडो चायनीज, इटालियन, थाई,मलएशियन असे अनेक पर्याय उपलबध आहेत. जोडीला सगळे fast food joints जसे की MacDonald, KFC, Pizza Hut पण आहेतच. पण तरीही भारतातील विशेषतः मुंबईतील food stalls ची सर त्याला नाही.

पण सर्वात जास्त आठवण येते ती मात्र आई बाबांची, आपल्या नातेवाईकांची, मित्र मंडळींची, आपल्या सण वारांची आणि हुकलेल्या लग्न सोहोळ्यांची! इथे देखील मित्र परिवार जमतोच आणि सख्या नातेवाइकांसारखी जवळीक देखील होते परंतु सगळे सण वर लगतच्या weekend ला कोणत्या तरी मित्राच्या घरी जमून, सगळ्यांच्या सोयीनेकिंवा महाराष्ट्र मंडळात साजरे करायचे याला कितीही म्हटलं तरी भारतातातील सणावारांचा अनुभव येत नाही. तो मौहोल जमत नाही हेच खरे! गणपतींच्या मूर्तीनी नटलेले मंडप, आकाश कंदिलांनी सजलेले रस्ते आणि फराळाच्या पदार्थांचे वास या सगळ्या वातावरणाचा feel खूप miss होतो. मात्र या विचार पाठोपाठ दर वर्षी ना चुकता माझ्या मनात येते कि हे सगळे miss करणे चांगले का त्या कानठळ्या बसवणाऱ्या बीभत्स गाण्यांपासून, आवाजाचे, हवेचे, पाण्याचे प्रदूषण वाढवणाऱ्या या गणपती, दिवाळी नवरात्रीच्या सणांपासून दूर राहिलेले चांगले! मुलींनी आपले सणवार भारतात अनुभवावेत असा खूप खूप मनात येत पण त्याच बरोबर या सगळ्या गुदमरावणाऱ्या वातावरणाची आणि त्यांच्या “असा का करतात इथे?” या प्रश्नांची भीती वाटते!

एकूणच येथील राहणीमान सुटसुटीत, आखीवरेखीव आणी संथ आहे. मित्रमंडळींच्या गाठीभेटी ते मुलांच्या “play dates” पर्यंत सगळे ठरवून करावा लागत. एकतर घरकामात कोणाची मदत नाही आणी त्यात DIY (Do it yourself ) राहणीमान. त्यात दोघांच्या नोकऱ्या, मुलींच्या शाळा, इतर activities त्यामुळे सहज कोणाकडे येण्या जाण्याला वेळच उरात नाही. याउलट मुंबईतील राहणीमानआला सतत गती आहे, खडतर, दमछाक करणारे असले तरी एक सहजता आणी आपल्या माणसांच्या सहवासाचा जिवंतपणा आहे हे मात्र खरं!

आताशा दुरून भारत कडे विशेषतः मोदी सरकारच्या बदललेल्या भारताकडे बघताना अनेकदा परत भारतात येण्याचा विचार मनात येतो नव्याने होणाऱ्या सुधारणांचे प्रगतीचे आपणही भाग असावे प्रत्यक्ष जवळून हे सकारात्मक बदल बघता यावेत असे खूप वाटते पण मन धजावत नाही. मुंबई ची गर्दी झिंग आणणारी असली आणी लोकल ट्रेन चा प्रवास कितीही miss होत असला तरी परत ते धकाधकीचं आयुष्य परत झेपेल का याची खात्री वाटत नाही! परत येऊन भारतातील नोकरी, उशिरा पर्यंत काम करत राहण्याची पद्धत, वरिष्ठांचे “बॉसिंग” एकूणच सगळं “Job culture” झेपेल का? असा प्रश्न पडतो. त्यात शाळांचे प्रवेश, शैक्षणिक क्षेत्रातील अतिरिक्त स्पर्धा, त्याचा मुलांवर येणार दबाव आणि सगळ्यात भयावह म्हणजे सतत सरसकट कानावर येणाऱ्या लैगिक अत्याचाराच्या बातम्या या सगळ्या गोंधळात परत येण्याचा विचार हलके हलके दाबून जातो.

इथे सगळ्याच सरकारी कामात, बँकेच्या कामात एकप्रकाची शिस्त आहे, ठराविक आणी हमखास काम करणारी कार्यपद्धती आहे. त्यामुळे या व्यवस्थांवर विश्वास टाकणे सहज शक्य आहे. परंतु त्यामुळे माणूस काही अंशी सरळ मार्गी बनून राहतो! याउलट भारतात विशेष करून पुण्य मुंबई सारख्या मोठ्या शहरात राहायचे तर अत्यावश्यक असलेला “street smartness” मुलींमध्ये येईल का? आणी तो आला तर बरं का त्याशवाय जगातील चांगुलपणावर विश्वास ठेऊन हलक्या innocence ने जगलेला बरं याच उत्तर अजून सापडायचं आहे!
अर्थात हे सगळे व्यावहारिक विचार बाजूला ठेवले तरी हा देश त्याच्या प्रेमात पडायला लावतोच ते म्हणजे मुख्य २ कारणांसाठी! एक म्हणजे नजरेच पारणं फिटेल असा सृष्टी सौन्दर्य अगदी आजूबाजूला रोजच्या रस्त्याला दिसत असते. सगळ्या बाजूनी दिसणारा हिरवा निळा समुद्र अनपेक्षित पणे एखाद्या लांबसडक उंच रस्त्याच्या टोकाला हा लपाछपी खेळल्यासारखा नजरे समोर येतो त्या क्षणाच्या आनंदाला, अचंब्याला उपमाच नाही! तसे सगळेच समुद्र किनारे सुंदर आहेत पण तरी Coromandel चा cathedral cave चा किनारा जिथे खूप मोठी दगडी कामं पाण्यात मिळते तो माझा सगळ्यात आवडता किनारा आहे. पण खरं सांगायचं झालं तर इतक लांब कुठे जावंच लागत नाही. घराच्या मागच्या walk way पासून ते ऑफिस समोरच्या park पर्यंत सर्वत्र हिरवाई निळाई आणी निसर्ग खचून भरलेला आहे. पण तरीही अगदी ठळक उदाहरणा द्यायचीच तर Queenstown चा Wakatipu तलाव, Taupo चा Hukka Falls, Milford sounds चे समुद्रात मिळणारे धबधबे इत्यादी.
येथे अजून एक नजरेत आणी मनात भरणारी गोष्ट म्हणजे इथून दिसणारा चंद्र! हा देश पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवापासून खूप जवळ असल्यामुळे इथून चंद्र आणी सूर्य वेगळ्या कोनात दिसतात पौर्णिमेचा उगवतीच्या चंद्र अक्षरशः पराती एवढा मोठा दिसतो आणी जरा पाय उंच केले तर हाताशी येईलसा भासतो. सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळी दिसणारे आकाशाचे आणि ढगांचे विभ्रम हा तर एक स्वतंत्र विषय आहे, ज्याचे सौन्दर्य आणि त्यातून मिळणारा आनदं केवळ अनभुव घेतला तरच कळेल. New Zealand मधील मूळ रहवासी लोकांना “माओरी” म्हणतात. त्यांच्या भाषेत या देशाला “आयोतिआरोआ” ( Aotearoa) असे म्हणतात. म्हणजे ‘लांबच लांब पसरलेया पांढया शुभ्र ढगांचा देश! आणि हे शब्दशः खरे आहे. ढगांचे इतके नानाविध आकार, रंग, वेग दिवसभर दिसत असतात आणि त्यात सूर्यास्ताची लाली मिळाली की तर नजरेचं पारणं फेडतात. तीच spring मध्ये दिसणाऱ्या इंद्रधनुष्याची! आपल्याकडे तास दुर्मिळच असलेला हा देखावा पाहून सुरवातीच्या दिवसात मी अगदीच हरखनू जात असे. हळुहळू लक्षात आलं की इथे वर्षभरात केव्ह्नही पाऊस पडत असल्याने इंद्रधनुष्य देखील अनेकदा दिसतात.आणि नुसती साधी नाही तर अनेकदा दुहेरी, संपूर्ण अर्धगोल आणि काडी तर तिहेरी सुद्धा दिसतात!!!

आणी दुसरे प्रमख कारण म्हणजे येथील मनमिळाऊ, शांतता प्रिय, हसरी माणसं! रस्त्याच्या कडेला, सहज चालत सुद्द्धा good डे/ good morning म्हणणारी माणसे पाहून सुरुवातीच्या दिवसात मला खूपच आश्यर्य वाटत असे. पण मग हळू हळू लक्षात आले कि या अनोळखी माणसांच्या सध्या शुभेछया सुद्धा किती सुखावून जातात! मुळातच इथल्या दुकानात, बँकेत, रस्त्यावर सिग्नल ला उभे असताना सुद्धा सगळ्यांच्या वागण्यात एक प्रकारची हसरी शांतता (warmth) असते जी मला आता पर्यंत पाहिलेल्या इतर देशात अनुभवयला आली नाही, हे खरं!

या सागळ्या छोट्या, महत्वाच्या न वाटणाऱ्या गोष्टींची पण रोजच्या आयुष्यात इतकी सवय होते कि इथे त्या वेगळ्याने जाणवतही नाहीत, पण भारतातल्या (किंवा इतरही कुठल्या देशातल्या) महिनाभराच्या सुट्टीत देखील मी या गोष्टी miss करायला लागते आणी तेव्ह्ना लक्षात येते की नाळ जरी मुंबईशी जोडी असली तरी आता मन मात्र इथेही जोडलं गेलाय. Auckland सुद्धा आपलं घर झालंय. आणी हे जेव्ह्ना लक्षात आला तेव्ह्ना आम्ही New Zealand चे नागरिकत्व घ्यायचा ठरवलं. भारत दुहेरी नागरिकत्व मान्य करत नाही; त्यामुळे आम्हाला भारताचा पासपोर्ट रद्द करून घाव लागला.त्याचा खूप वाईट वाटलं. मुली तर जन्मानेच येथील नागरिक आहेत. पण अजूनही राष्ट्रगीत म्हटलं कि “जन गणं मन” च तोंडावर येतं आणी सिनेमा पाहायला थिएटर मध्ये गेलो कि राष्ट्रगीत लागत नाही म्हणून चुकल्या सारखं हि वाटतंच!!

पण इथल्या पासपोर्टवर जगात १५० हून अधक देशात visa free प्रवेश आहे या मुख्य कारणास्तव आम्ही पासपोर्ट बदलनू घेतले. पुढे जेव्ह्ना केव्हा जगभ्रमंतीची संधी मिळेल तेव्ह्ना बरं पडेल. पासपोर्ट रद्द झाल्याचं वाईट वाटत असलं तर नागरिकत्व स्वीकारल्याचे अपराधीपण मात्र कधीच वाटले नाही! उलट मला तर असं वाटतं की जे हे काही लाख अनवासी भारतीय जगभर पसरले आहेत त्यांच्यामुळे कितीतरी परकीय चलन भारतात येते आहे. हि रक्कम किती असते हे केवळ अर्थतज्ज्ञच सांगू शकत असले तर ते भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खपूच महत्वाचे आहे हे आपल्या सारख्या सामान्य माणसांना देखील चांगलेच ठाऊक आहे.शिव हे अनवासी भारतीय वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करतात ते देखील तितकेच महत्वाचे आहे.

कधीकधी मात्र हे दुहेरी आयुष्य नको वाटते. सतत काहीतरी निसटून जात आहे, मागे मागे राहतेय असे वाटते. पण मग याच वेळी असेही मनात येते की उलट या दहुेर आयुष्यामुळे कितीतरी नवीन गोष्टी समजल्या, अनुभवायला मिळाल्या. स्वतंत्र पाने निर्णय घेण्याची आणि ते निभावून न्यायची क्षमता वाढली. भारतातील सुरक्षित कुटुंब व्यवस्थेतून बाहेर पडून आयष्यतील छोट्या मोठ्या समस्यांना सामोरे जाताना स्वतःची कुवत लक्षात आली. मग ते आजारी मुलीला day care ठेऊन ऑफिस ला जायाची ओढाताण असो, चार महिन्याच्या बाळाला एकयाने सांभाळण्याची कसरत असो किंवा नोकरी, आर्थिक चणचण असा काही मोठा प्रश्न असो, सगळ्यातून आई वडिलांच्या मदती शिवाय निभावून न्यायची मानसिकता तयार झाली. आणि याच वेळी आपल्याकडील भक्कम कुटुंबव्यवस्थेचे व सामाजिक व्यवस्थेचे महत्व नव्याने जाणवले. आपण जरी भारताबाहेर राहात असलो तर अशी कौटुंबिक ओढ मुलींमध्ये निर्माण करता यायला पाहिजे याची आई म्हणून नव्याने जाणीव झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा वर्षांच्या स्थलांतराने आम्हाला खूप काही शिकवले, घडवले. खपू गोष्टी समजल्या, सापडल्या. काही हरवल्या देखील! पण अखेरस असेच वाटते की या सगळ्या अनुभवांशिवाय आयुषय अर्धवटच राहिले असते! त्यामुळे देवाने दिलेल्या या संधी साठी त्याचे खूप खूप आभार! या देशाशी जुळलेले हे बांधा अजून किती वर्षासाठी आहेत ए आटा तरी माही नाही पण जगाच्या पाठीवर आता दोन देश माझे आहेत हे मात्र खरं!

Author
Sharda Kolekar

Facebook page

Advertisement